उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अपघातात महावितरणचे कर्मचारी मोहन राजाराम वरघट (वय ४९, रा. मानसरोवर कोरेगाव मूळ, ता. हवेली, पुणे) हे गंभीर जखमी झाले होते. वरघट यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, वरघट यांचा आज सोमवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक प्रामाणिक, हरहुन्नरी व कष्टाळू कर्मचारी हरपल्याने उरुळी कांचन महावितरण उपविभागात शोककळा पसरली आहे.
मोहन वरघट हे महावितरण विभागात १३ वर्षांपूर्वी कामाला लागले होते. ते सध्या उरुळी कांचन शाखा क्र. २ मध्ये मुख्य तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. वरघट हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता. ७) अष्टापूर परिसरात काम करण्यासाठी गेले होते. संध्याकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर वरघट हे पुणे-सोलापूर महामार्गावरून कोरेगाव मूळकडे विरुद्ध दिशेने चालले होते.
दरम्यान, स्वप्नील राजेंद्र ताम्हाणे (वय ३७, मु. पो. ताम्हाणवाडी, ता. दौंड, जिल्हा पुणे) व मोहन वरघट या दोघांच्या दुचाकींची उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात गुरुवारी (ता. ७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात वरघट हे गंभीर जखमी झाले होते. वरघट यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
वरघट यांच्या डोक्यातून जादा रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या डोक्यावर शुक्रवारी (ता. ८) शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वरघट यांनी मृत्यूशी १२ दिवस दिलेली झुंज आज संपली. विश्वराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान वरघट यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, वरघट यांच्या पार्थिवावर मूळ गावी नरखेड (जि. नागपूर) येथे मंगळवारी (ता. १९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वरघट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.