पुणे : बारामती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मोक्काच्या आरोपाखाली कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपीला पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला. या आरोपीला तीन वर्षांनंतर जामीन मंजूर झाल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.
अमीन दिलावर इनामदार असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी अमीन व त्याचे इतर ५ ते ७ मित्र फिर्यादी याचे स्नेहा गार्डन हॉटेल या ठिकाणी गेले होते. तेव्हा आरोपीने हॉटेल मालकास त्यास हॉटेल चालवायचे असेल तर दरमहा २५ हजार रुपये महिना खंडणी म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी केली होती. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीस त्याची ऐपत नसून थोडे फार पैसे देत जाईल, असे सांगितले होते.
तेव्हा आरोपींनी ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे सांगून फिर्यादीच्या हॉटेलमधील दारूच्या बाटल्या काढून घेतल्या व त्या पिऊन झाल्यावर फिर्यादीस मारहाण केली होती. त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून बारामती पोलिस ठाण्यात आरोपी व त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान मोक्का कायद्याचे कलम लावले आले होते.
आरोपी येरवडा कारागृहात असताना आरोपी अमीन यांनी अॅड. विपुल दुशिंग, अॅड. नितीन भालेराव यांच्याद्वारे पुणे येथील विशेष न्यायलयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपी याने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपी व फिर्यादी यांच्यात व्यवहारावरून वाद झाले होते. आरोपी यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांना तपासादरम्यान कुठलाही पुरावा हस्तगत करता आला नसल्याने आरोपीस जामिनावर सोडण्यात यावे, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला होता. आरोपी पक्ष व सरकार पक्षांचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील विशेष न्यायधीश व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टाने आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. या कामी अॅड. सुरज शिंदे यांनी मदत केली.