पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचारही जोरदार सूरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे चांगलेच चर्चेत आले आहेत. आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात ही नोटीस पाठवल्याचे सुप्रिया सुळे असल्याचा खुलासा केला आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील वडगाव शेरीत आयोजित सभेमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस मी स्वतः पाहिली नाही. मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे, की जर तुम्ही पोर्श केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू. आता ही नोटीस मी बघणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. सत्यमेव जयते होणार आहे. पोर्श चालकाकडून हत्या झाली असेल आणि त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही बोलणार असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या घटनेच्या वेळी स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते. ते का गेले होते? या प्रकरणावर पवार साहेब जर खरे बोलले तर त्यांना वकिलाकडून नोटीस पाठवली जाते. परंतु आम्ही तयार आहोत. कारण नेहमी सत्यमेव जयते होते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बापू पठारे कॅबिनेट मंत्री असतील…
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये विरोधक हे पाहिजे असतात. माझ्या विरोधात तर सगळी यंत्रणा होती. सरपंच ते केंद्र सरकार यंत्रणा होती. त्यानंतरही जनतेने मला निवडून दिले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून बापू पठारे कॅबिनेट मंत्री असतील? अशी घोषणा वडगाव शेरीच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी केली. बापू तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत, मला एक शब्द द्या, तुमच्या मतदारसंघात अपघात झाल्यास पोलीस स्टेशनला न जाता रुग्णालयात जाल. रुग्णालयात जाऊन त्या गरीब माणसाला मदत कराल, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.