पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तडकाफडकी उपनेतेपद आणि विदर्भ समन्वयपदाचा राजीनामा दिला, तर माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा पत्ता कट केल्याने तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्त केली.
गेल्या दहा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या महायुती सरकारचा विस्तार रविवारी १५ डिसेंबर रोजी पार पडला. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मागील अडीच वर्षे आशेवर असलेल्या भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, डॉ. आशिष जैस्वाल यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली. महायुती सरकार सत्तेच येताच शिवसेनेतील आमदारांनी मंत्रीपदासाठी संधी मिळावी, यासाठी जोर लावला होता.
भंडाऱ्याचे आमदार नरेद्र भोंडेकर इच्छुक होते. मात्र, मंत्रिमंडव्यतून त्यांना वगळण्यात आल्याने त्यांनी उपनेते, विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. आमदारकी राजीनामा मात्र त्यांनी दिलेला नाही. तसेच शिवसेनेच्या बाजूने यापुढे कोणतीही भूमिका मांडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर पहिल्या दहा मध्ये भोंडेकर शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. शिंदे योग्य निर्णय करतील, अशी अपेक्षा होती; परंतु पुन्हा एकदा अन्याय झाल्याचे भोंडेकर यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारमध्ये मंत्रीपदावर पुन्हा संधी मिळावी, यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपने काही जणांच्या नावावर आक्षेप घेतला होता, त्यात या तिन्ही नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे तिन्हीं माजी मंत्र्यांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती, तरीही वरिष्ठ असल्याचे सांगत मंत्रीपदासाठी शिंदे यांच्याकडे लॉबिग सुरू केली. शिंदे यानी तिघांनाही आश्वासन दिले. मात्र, शपथविधीच्या दिवशीच तिघांचेही पते कापल्याने तिघेही प्रचंड नाराज झाले. तिघांनीही नव्या मंत्रिमंडळात शिंदे सरकारच्या काळातील गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड यांच्या नावावर आक्षेप घेत मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमापासून चार हात लांब राहिले. तिघांची ही अनुपस्थिती चांगलीच चर्वेची ठरली होती.