केडगाव : दौंड तालुक्यातील एक नंबरची आदर्श ग्रामपंचायत म्हणून मिरवडी ग्रामपंचायतचे नाव अग्रेसर आहे. कारण ग्रामपंचायतची भव्यदिव्य अशी आदर्शवत इमारत त्यात चालणाऱ्या पारदर्शक कारभारामुळे ही ग्रामपंचायत महाराष्ट्रभर ‘फेमस’ झाली. या ग्रामपंचायतच्या कारभाराचे धडे शिकण्यासाठी आता पुणे जिल्हा बाहेरूनही अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग हे भेट देण्यासाठी येत आहेत.
जिल्हा परिषद रत्नागिरीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. ११) आदर्श ग्रामपंचायत मिरवडी कार्यालयाला अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर व मंडणगड या तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज अंतर्गत कर्मचाऱ्यांनी आदर्श गाव भेट अभ्यास दौरा आयोजित केला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील नाणेकरवाडी, जांबुत, कोंढापुरी व मिरवडी अशा आदर्शवत ग्रामपंचायतींचा समावेश होता.
या अभ्यास दौऱ्यामध्ये रत्नागिरी येथील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, आरोग्यसेवक व इतर अनेक क्षेत्रातील सदस्यांचा सहभाग होता. ही सर्व मंडळी ग्रामपंचायत मिरवडी येथे भेट देण्यासाठी आले असता मिरवडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, उपकेंद्र, अंगणवाडी, शाळा, सोसायटी कार्यालय व वृक्षलागवड व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून अत्यंत समाधानी झाले. यावेळी सर्वांना वृक्षभेट देऊन मिरवडी गावाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यातील अधिकाऱ्यांनी गावचे कौतुक करून मिरवडीकरांनाही रत्नागिरीसाठी आमंत्रित केले. यावेळी सरपंच शांताराम थोरात, उपसरपंच प्रवीण कोंडे, सदस्य शुभांगी शिंदे, ग्रामसेवक जाधव, अण्णा थोरात व अशोक भगत, रमेश कांबळे उपस्थित होते. गावाची संपूर्ण माहिती माजी सरपंच सागर शेलार यांनी दिली.
मिरवडीच्या कामाची झलक पोहचली संपूर्ण महाराष्ट्रभर
असे अधिकारीवर्ग संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, तेव्हा प्रत्येक ग्रामस्थांना अभिमानास्पद वाटत असते. कारण ग्रामपंचायत मिरवडीच्या कामाची झलक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचली आहे. आम्ही सर्वांनी मिळून जे काम केले व करत आहोत ते निश्चितच योग्य करत असल्याचे आम्हाला वाटते.
– सागर शेलार, माजी आदर्श सरपंच, मिरवडी.