पिंपरी : पिंपरीमधील निराधार नगर येथे सात जणांनी मिळून एका १६ वर्षीय मुलाचे अपहरण केले. मुलाला पाकिट व मोबाईल चोरी करून ते आणून देण्याबाबत धमकी दिली. मात्र, हे काम करण्यास नकार दिल्याने मुलाला कोयत्याने, हाताने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.६) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
आयुष लालचंद परदेशी (वय १६, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन शिवाजी सुर्वे (वय ३८), आर्यन सुर्वे (वय १८), अंकित राजेश सहाणे (वय १८), गोट्या उर्फ अक्षय संजय छत्री (वय ३३), एक अल्पवयीन मुलगा, एक महिला आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन, आर्यन, अंकित आणि गोट्या या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी निराधार नगर, पिंपरी येथून पायी चालत जात होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगा आणि इतर आरोपींनी परदेशी यांचे दुचाकीवरून अपहरण केले. त्यांना पिंपरी रेल्वे ब्रिजखाली आणून त्यांना पाकीटमारी व मोबाईल चोरी करायची आणि ते साहित्य आम्हाला आणून द्यायचे, असे सांगण्यात आले. परदेशी यांनी यासाठी नकार दिला असता आरोपींनी त्यांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी परिसरात दहशत करत ‘आम्हाला भाई म्हणायचे नाहीतर मर्डर करू’ असे म्हणत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.