पुणे : शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी अडवल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील या परिक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. या वेळी आक्रमक विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर डीएड आणि बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शिक्षण भरतीमधील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र आरक्षण रद्द करावे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला घेराव घातला. विद्यार्थ्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांनी गाडीला घेराव घातल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले होते. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी पुढे सोडण्यात आली.
दरम्यान, डीएड आणि बीएडचं शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना आज नोकरी मिळणं खरंच खूप अवघड आहे. अनेक विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. काही विद्यार्थी खूप तुटपुंज्या पगारात काम करत असतात. तर काही विद्यार्थी आपण पर्मनंट होऊ या आशेने वर्षोनुवर्षे एखाद्या शिक्षण संस्थेत कार्यरत असतात. अशा तरुणांचा नोकरीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.