पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील थंडीचा पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या मध्यवर्ती भागातील किमान तापमान १०, तर एनडीए परिसरात ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शिरूर तालुक्यात सर्वात कमी ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील २ दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुढील काही दिवस राज्यासह पुण्यातील किमान तापमानात ३ ते ४ अंशाने घट होऊन थडांचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे ८ अंशावरील किमान तापमान १४ अंशावर जावून पोहचले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली. मात्र, आता स्थिती पुन्हा बदलली असून पुढील २ दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तर किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होणार असल्याने दिवसाही थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहराच्या काही भागांतील किमान तापमान
शिरूर ८.७
हवेली-९
एनडीए-९.८
लोणावळा-१०
शिवाजीनगर-१०.९
लवासा-११.२
बारामती-११.८
भोर-१४.२
कोरेगाव पार्क आणि चिंचवड-१६.३
मगरपट्टा-१७.१
वडगावशेरी-१८.४
पाषाण-१२
नारायणगाव-१२.४
पुरंदर-१२.६
इंदापूर-१३.१.