हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. मागील एक ते दीड महिन्यापासून कमी झालेले दुधाचे दर तर दुसरीकडे पशुखाद्य, हिरवा चारा, चुरापेंड यांचे वाढलेले दर यामुळे पूर्व हवेलीतील दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. तसेच शासनाने दुधाचे दर निश्चित करूनही अवघ्या काही महिन्यांत दूध खरेदी दर कमालीचे घटले आहेत. परिणामी, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.
यंदा पावसाअभावी चारा नाही आणि दुधाचा दरही कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. खासगी संकलन केंद्रे कवडीमोल दराने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. दूधवाढीसाठी आवश्यक पशुखाद्य महागड्या दराने खरेदी करावे लागत आहे. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने सध्या हा व्यवसाय तोट्याचा बनत चालला आहे.
जर्सी दुभत्या गायीच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या संकरित गायी-म्हशी खरेदी करून शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन करू लागला. शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्याकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्याला दूध व्यवसाय थोडाफार परवडतो. मात्र, विकत घेऊन चारा घालणे हे परवडणारे नाही. गेल्या सुमारे महिन्यापासून दुधाचे दर लिटरला सात ते आठ रुपयांनी कमी झाले आहेत. दूध दरासंदर्भात शासनाने नेमलेल्या विविध समित्या कागदावरच असल्याने दराअभावी शेतकरी देशोधडीला लागत आहेत.
दरम्यान, दुधाचे दर पावसाळ्यामध्ये उतरतात. तर हिवाळ्यात त्यात तेजी येते. यंदा मात्र उलटे होत आहे. सध्या दूध, दुग्धजन्य पदार्थांना मागणी असूनही दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. तीन महिन्यांपूर्वी गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर ३८ रुपये होते. ते आता ३० रुपये झाले आहेत. चाऱ्याच्या किमती व पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. असे असतानाही दुधाचे दर घसरल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. दूध पावडर निर्यात होत नसल्याने दुधाचे भाव कमी झाल्याचे दूध खरेदीदार सांगत आहेत. अजून दर खाली येण्याचे संकेत त्यांच्याकडून मिळत आहे.
दुधाची मलई नेमके खाते कोण..
पाच-सहा महिन्यांपासून गायीचे दूध ४० ते ५० रुपयांपर्यत मिळते. म्हशीचे दूध ६० ते ७० प्रतिलिटर आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या दरात बदल झालेला नाही. मग दुधाची मलई कोण खाते, असा प्रश्न शेतकरी व ग्राहकांकडून विचारला जात आहे. जनावरांचे व्यवस्थापन महागले आहे. मात्र, दुधाचे दर ढासळल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील दुध उत्पादक शेतकरी बाळा मेमाणे म्हणाले, “पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याबरोबरच हिरवा व सुका चाराही महागला आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेले दर परवडत नसून कष्ट वाया जात आहेत. दुधाचे दर वाढीसाठी शासनाने पावले उचलावीत. कमीत कमी शासनाकडून ३५ रुपये भाव हा दुध उत्पादकांना एका लिटरसाठी मिळाला पाहिजे. पुढील दोन दिवसात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दुध उत्पादक शेतकरी भेटून दरवाढीबाबत निवेदन देणार आहोत.”