पुणे : शिक्षण, नोकरी, व्यवसायात प्रगती करणाऱ्या समाजाची प्रगती होत आहे. मात्र, वर्षानुवर्षे कोयता हातात घेऊन भल्या पहाटे गोड साखरेसाठी ऊसाची तोडणी करणाऱ्या कामगारांच्या पिढीच्या आयुष्यात मात्र कडवटपणाच येत आहे. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामात हा प्रचंड विरोधाभास पहायला मिळत आहे. उद्याचा सूर्य नवी पहाट घेऊन येईल का? ऊसतोड मजूरांची पुढची पिढी साक्षर होईल का? का आमच्या पाचवीला निरक्षरताच पूजलेली आहे, असे एक ना अनेक प्रश्न ऊसतोड मजूरांना पडत आहेत. सततच्या स्थलांतरामुळे या कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा रथ रोखला गेल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही.
सध्या राज्यात साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी कामगार आपली उपजीविका करण्यासाठी पाल ठोकून विसावले आहेत. गावाच्या कुशीत शेतशिवारावर असणाऱ्या पालामध्ये पहाटेच्या थंडीत उबदार गोधडी पांघरलेले मजूर, बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळेचा आवाज, धुक्यातून वाट काढत निघालेल्या गाड्या… असे दृश्य दिसत आहे. सकाळच्या प्रहरी शाळेत जाणारी सुटाबुटातील मुले पाहून या मजूरांच्या व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह उमटते. आमच्या आयुष्यात ही शाळा केव्हा येणार, अशी प्रश्नार्थक नजरा विचार करायला भाग पाडतात.
सध्या राज्यात ऊस कारख्यान्यांच्या चिमणीची धुराडी पेटत आहेत. मराठवाड्यातील तसेच खानदेशमधील गावांतील ऊस तोडणी मजूर आपली उपजीविका चालविण्यासाठी ऊस कार्यक्षेत्रात स्थलांतरीत झाले आहेत. त्यांच हेच स्थलातर मुलांच्या शिक्षणाच्या आड येऊन, भविष्यातील पिढीला देखील हातात कोयता घेण्यास भाग पाडत आहेत. हे मजूर वर्षातील किमान आठ ते नऊ महिने आपल्या गावापासून ऊस तोडणीस येथे वास्तव्यासाठी असतात.
उघड्या माळरानावर झोपड्या ऊभारून त्यांचा संसार सुरू होतो. आता तर साखर कारखान्यांनी प्लास्टिकचा कागद देऊन लहान लहान तंबू उभारलेले दिसू लागले आहेत. याठिकाणी रस्ते, विज, पाणी अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात. ऊस तोडताना मजूर आपली मुले झोपडीवरच ठेवतात. पहाटे गेलेले आई-वडील रात्री उशीरा घरी परतेपर्यंत मुलेच एकमेकांचे आधार असतात. एक-दोन वर्षांच्या भावंडाना तीन-चार वर्षांची मुले दिवसभर सांभाळतात. गाडीचा, सायकलचा टायर, फरशीचे लहान लहान तुकडे हे त्यांचे खेळाचे साहित्य असते. टायरच्या एका गिरकीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. त्यात एक अनोखी उर्जा पहावयास मिळते.
चुलीच्या राखेतून रांगोळी तयार होताना पाहणे, हाच या मुलांसाठी आनंदाचा क्षण असतो. कधी गारपीट तर कधी अवकाळीने झोपडल्याचा अनुभव देखील याच झोपडीत मिळतो. अक्षर ओळख नाही, अंगावर धड कपडा नाही, झोपडीतील ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत चिमुरडे जगत असतात. गावागावांमध्ये उभ्या राहिलेल्या या वस्त्यांवर लहान लहान विक्रेते येतात. त्यावेळी त्यांनी आणलेली बिस्किटे, चॅाकलेट, बुढी के बाल, आइसक्रिम हा खाऊ मुलांसाठी पर्वणी ठरतो. ऊस तोडणीसाठी काम मिळेल त्या गावात जावे लागत असल्याने मुलांना एका शाळेत ठेवणे शक्य होत नाही.
पालावर शिक्षक फिरकलेच नाहीत…
उस तोडणी मजूरांच्या मुलांना शिक्षणाची ओढ लागावी म्हणून साखर शाळा उघडण्यात आल्या. मात्र, बोटावर मोजण्याइतपत साखर शाळेतून मुलांना शिक्षण मिळाले. आपल्या अकलेचे पाढे वाचून शिरूर तालुक्यातील एका शिक्षकाने प्रसिद्धी मिळण्यासाठी गेल्या वर्षी या मुलांना एकत्रित करून शिक्षणाचे धडे दिले. या वर्षी मात्र ते या पालांवर फिरकलेच नाहीत.
ऊसतोड मजूरांची धडपड…
फडात ऊस भरण्यासाठी वाहने रात्री-अपरात्री तर कधी भल्या पहाटे देखील येतात. अशावेळी मिळेल त्या काट्याकुट्यांवर आणि पालापाचोळ्यावर स्वयंपाक उरकून ऊसतोडणीसाठी फडाची वाट धरावी लागते. दिवसभर कष्ट करून रात्री पुन्हा पोट भरण्याची धडपड सुरू होते. दोन-तीन किलोमीटर गावात पायपीट करून धान्य दळून घ्यायचे, तेल-मिठ घेऊन पुन्हा अंधारात ठेचकाळत झोपडीकडे यायचे. आणलेले अन्न शिजेपर्यंत अर्धी रात्र संपते. आयुष्याचा खडतर प्रवास करणाऱ्या या मजूरांच्या पुढील पिढीच्या आयुष्यात तरी ज्ञानाचा प्रकाश पडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.