पुणे : नवीन वर्षात म्हाडा तुम्हाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहे. म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा (ता.५) गुरुवार पासून सुरु होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढे कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे.
सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार म्हणजेच ५ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामध्ये जवळपास सर्वच प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. या प्रक्रियेमध्ये अर्ज करताना अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित असेल.
ज्यानंतरच अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. सोडतीमध्ये नाव येणाऱ्या अर्जदारांना घराचा तात्काळ ताबाही मिळणार आहे. मुख्य म्हणजे या सोडतीसाठी कुणीही नोंदणी करु शकणार आहे.
दरम्यान, अमुक एका ठिकाणी घर घेण्यासाठीची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारांनी अर्ज करत पुढील प्रक्रीया पूर्ण करावी. नव्या नियमांनुसार नोंदणी करतानाच अर्जदार (इच्छुक) पॅनकार्ड , आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. तर, सामाजिक आणि इतर आरक्षित वर्गातील अर्जदारांनी सदरील प्रमाणपत्र, जातीचा दाखला सादर करावीत.