पुणे : कुरकुंभमध्ये (ता. दौंड) मेफेड्रोन तयार केले जात असल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) समांतर तपास जारी केला असून, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला तस्कर संदीप धुनिया व्हिएतनामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थांचा तस्कर ललित पाटील याच्या अमली पदार्थ रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका बंद कारखान्यात मेफेड्रोन (एमडी) हे अमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती गेल्या वर्षी पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तेथे छापा टाकून कोट्यवधी रुपये किमतीचे एक हजार 36 किलो मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणाची पाळेमुळे खणत पोलिसांनी पुण्यासह मुंबई, दिल्ली आणि नाशिक परिसरात छापे टाकून तब्बल तीन हजार 674 कोटी रुपये किमतीचे एमडी जप्त केले. या प्रकरणाचा तपास सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (एनसीबी) सुरू आहे. या तपासामध्ये अंमली पदार्थांचे धागेदोरे विदेशापर्यंत पोचले असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाचा एनसीबीबरोबरच सीबीआयकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात दिल्लीतून अटक केलेला आरोपी संदीप यादव याने कुरिअरद्वारे 400 कोटी रुपयांचे 218 किलो मेफेड्रोन लंडनला पाठविले होते. यादव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयूब मकानदार, संदीपकुमार बसोया, दिवेश भुटानी, संदीप यादव, देवेंद्र यादव, सुनीलचंद्र बम्रन, मोहम्मद कुरेशी, शोएब शेख, सिनथिया उगबाब, अकीता दास, निशांत मोदी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, दिल्लीस्थित मुख्य सूत्रधार संदीप धुनीया फरारी आहे. तो व्हिएतनाममध्ये असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असून, तेथील सरकारच्या माध्यमातून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मेफेड्रोन विक्री प्रकरणात पुणे पोलसांच्या गुन्हे शाखेने सोमवार पेठेतील गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, हैदर शेख यांना पकडले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत मेफेड्रोन कुरकुंभ औद्यौगिक वसाहतीतील अर्थकम लॅबोरटरीजमध्ये तयार केल्याचे उघडकीस आले होते. तेथून दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या शहरांत आणि लंडनमध्ये मेफेड्रोन विक्रीस पाठविल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, कुरकुंभमध्ये जप्त केलेले मेफेड्रोन नष्ट करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिसांनी केल्याने मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पुण्यात करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी एनसीबीला नुकतेच दिले आहे.