पिंपरी : सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आयोजित समर्थ रामदास स्वामी पादुकांचा दौरा शुक्रवार (ता. ८) ते शनिवार (ता. १६) डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. त्याअंतर्गत ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात शुक्रवारी ४ वाजता स्वामींच्या पादुकांचे आगमन होत असून, १६ डिसेंबरपर्यंत भाविकांना पादुका दर्शनाचा लाभ घेता येईल.
स्वामींच्या पादुका दौऱ्यानिमित्त ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी काचघर, संभाजीनगर, निगडी एल.आय.जी., पेठ क्रमांक २६, रावेत, यमुनानगर, आकुर्डी, सिद्धिविनायकनगरी या परिसरात सकाळी ८ ते १२ या वेळेत सांप्रदायिक भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत अनुक्रमे वैदेही भजनी मंडळ, स्वरशारदा भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ, नवचैतन्य भजनी मंडळ, सरस्वती भजनी मंडळ, ज्ञानदीप उपासना मंडळ, स्वरशांती भक्ती मंडळ भजनसेवा रुजू करतील. दररोज सकाळी ६ वाजता काकड आरती, पादुकांची महापूजा आणि आरती तसेच सायंकाळी ७:१५ वाजता करुणाष्टके, सवाया, आरती आणि शेजारतीचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय दररोज सायंकाळी ५ वाजता मकरंदबुवा करंबेळकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, रात्री ८:३० वाजता अजेयबुवा रामदासी यांचे अध्यात्मिक प्रवचन होईल. सर्व भाविकांनी या आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.