योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस हद्दीत जातेगांव बुद्रुक आणि आरणगावमध्ये पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत शिरुर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या तीन ठिकाणी स्वतंत्र बैठक घेतली.
शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या तीनही पोलिस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या गावातील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत ढोले यांनी सुचना दिल्या. तसेच ज्या गावात पुर्वीपासुनच ग्रामसुरक्षा दल कार्यरत आहेत. त्यांनी परत कामाला सुरवात करावी, असेही ढोले म्हणाले.
तसेच प्रत्येक गावातील महत्वाची ठिकाणे, मुख्य चौक आणि गावात येणारे जाणारे रस्ते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे उपस्थित होते.