इंदापूर : बदलती जीवनशैली हे उच्चरक्तदाब व मधुमेह यांसारख्या आजारांसाठी महत्त्वाचे कारण असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत शिंदे यांनी केले. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र, साठे नगर याठिकाणी रक्तदाब तसेच मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत शिंदे म्हणाले, शहरात नव्याने सुरू झालेल्या आरोग्य केंद्रामधील सुविधांबाबत जनतेस माहिती होण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 40 वर्षापुढील 50 नागरिकांची उच्चरक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. या आजारांबाबत समुपदेशन करुन उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ व डॉ. सुश्रुत शहा यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराचे आयोजन डॉ. हनुमंत शिंदे यांनी केले होते. शिबिर यशस्वी करणेसाठी परिचारिका आयेशा तांबोळी, प्रणिता भोसले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौरभ देवकर, सफाई कर्मचारी संतोष लोखंडे, अभय मोरे आणि प्रियांका सरवदे यांनी प्रयत्न केले.