लोणी काळभोर (Loni Kalbhor): लोणी काळभोर आणि परिसरात गुन्हेगारी कृत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात अभिजीत आहेरकर व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी ८३ व्या मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून मोक्काची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याने ते गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. आरोपी अभिजीत अभिमन्यु आहेरकर, प्रथमेश गणेश आयरे, प्रणव भारत शिरसाठ, अभिषेक दत्तात्रय रामपुरे, गौरव गोपीचंद बडदे यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदर आरोपींविरुद्ध लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.क. ३०७,३२६, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि. १९५१ चे कलम ३७ (१) (३), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी अभिजीत अभिमन्यु आहेरकर याने आपल्या इतर साथीदारांसह पाटीलनगर, बालाजीनगर, धनकवडी या परिसरामध्ये दहशत निर्माण व्हावी, यासाठी गुन्हेगारी कृत्य करत होता. अभिजीत आहेरकर याच्या विरुध्द् यापुर्वी २०१९ पासुन एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्र बाळगणे, प्राणघातक धारदार हत्यारे जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे याचा समावेश आहे.
दाखल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, परिमंडळ-५ यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केलेला होता. त्यास शनिवारी मंजुरी मिळाली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, तात्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस उप-निरीक्षक हनुमंत तरटे, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, तेजस भोसले, संदीप धनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, मंगेश नानापुरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.