उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी मयूर शेलार याची रिंग टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर फैजान शकील शेख याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या वतीने अहमदनगर, सोलापूर येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
सोलापूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील रिंग टेनिस स्पर्धेत मयूर शेलार याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर १४, १७ वयोगटातील मुले व मुलींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षीय वयोगटातील मुलींनी दुसरा क्रमांक मिळवला आहे.
अहमदनगर येथील विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी (ता. राहता जि. अहमदनगर) येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटातील बॉक्सिंग स्पर्धेत फैजान शेख याने ३० ते ३२ वजनी गटात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, या सर्व यशस्वी विद्यार्थी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शारीरिक शिक्षण अध्यापक प्रतिभा हरीभक्त, अविनाश कांबळे, संगीता शिर्के, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य, सर्व प्रशासकीय वर्ग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.