उरुळी कांचन, (पुणे) : शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी कसलेल्या आमदाराला तब्बल 74 हजार 550 मतांच्या फरकाने आस्मान दाखवले. मतदानाची आकडेवारी पाहता शिरूर- हवेलीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक पवार चारी मुंड्या चित करीत मतदारांनी आपला कौल माऊली कटके यांच्या बाजूने दिला आहे.
शिरूर – हवेली या मतदारसंघाच्या ऊस पट्ट्यातील मतदान हे ‘ऊसाचं कांडं आणि दुधाचं भांडं’ या दोन मुद्द्यांभोवती हि निवडणूक फिरली. या ऊस बागायत पट्ट्यातून शेतकऱ्यांनी अशोक पवार यांना सपशेल डावलले. तर माऊली आबा कटके यांच्या पारड्यात शेतकऱ्यांनी भरभरून मते दिली. यामुळे या निवडणुकीत तब्बल पाऊन लाख मताच्या फरकाने अशोक पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे अशोक पवार यांचे क्रियाशील कार्यकर्ते कोमात असून पराभवातून अद्यापहि सावरलेले नाहीत.
राजकीय पदे व सत्ता स्वतःच्या घरात ठेवल्याने शिरूर व हवेली परिसरात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. ‘पुणे प्राईम न्यूज’ने पूर्व हवेलीतील गावांमध्ये विविध शेतकरी, व्यापारी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार व भाजी विक्रेते यांच्याशी बोलून आढावा घेतला होता. यावेळी नागरिकांमध्ये अशोक पवार यांच्याविषयी असलेली नाराजी जाहीरपणे नागरिकांनी बोलून दाखवली होती. तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद झाल्याने तसेच कारखान्याचे चेअरमनपद आपल्याच मुलाला दिले होते.
सभापतीपद देखील त्यांच्या पत्नीलाच दिले होते. यामुळे शेतकरी वर्गात तसेच राजकीय नेते, पुढारी, कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, कोणीही उघडपणे बोलू शकत नव्हते. त्या सर्वांनी मतदानातून आपली नाराजी व्यक्त केली. तसेच जनतेच्या मनातील असंतोषाला अजित पवारांनी प्रचारातून जागा करून दिली होती.
पूर्व हवेलीसह शिरूर परिसरात काही झाकणझुल्या कार्यकर्त्यांना अशोक पवार यांनी जवळ केले होते. काही कामानिमित्त गावात आले तरी बोटावर मोजण्याइतक्याच कार्यकर्त्यांना आमदार आल्याची माहिती होत होती. यामुळे परिसरातील नेत्यांनी, पुढाऱ्यांसह अनेक गावातील तरुणांनी आमदार अशोक पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अनेकजण अशोक पवार यांच्यापासून दूर गेले व त्यांनी विरोधात काम केले. त्याचा फायदा माऊली कटके यांना झाला.
दरम्यान, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, शिंदवणेसह परिसरातील अनेक गावातील पुढारी हे अजित पवार यांच्या बाजूने होते. सर्वसामान्य मतदार जुने वरिष्ठ नेते, कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या बाजूने होते. उरुळी कांचनसह परिसरात शरद पवार यांचा करिष्मा कायम चालतो. मात्र या निवडणुकीला शरद पवारांचा करिष्मा चालला नाही.