पुणे : येरवडा येथून एकी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रकार उघडकीस आता आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुद्धा आई, वडिल आणि आजी यांनी तिचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा येथील १७ वर्षाच्या मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार मिना राजेश इरले (वय ४०), राजेश इरले (वय ४२, रा. पिंपळे गुरव), शोभा नवगिरे (वय ५५, रा. यशवंतनगर, येरवडा), संगिता रंजित गायकवाड (वय ५०, रा. बोपोडी), पती गणेश टाकळकर (वय २४, रा. वाफगाव टाकळकर वाडी, ता़ खेड), संजय टाकळकर (वय ५५, रा. वाफगाव टाकळकरवाडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ मार्च ते ३० जून २०२३ दरम्यान वाफगाव टाकळकरवाडी येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन आहेत, हे माहिती असून देखील तिचे आई वडिल व इतरांनी तिला वाफगाव येथे नेले. तेथे तिचा विवाह लावून दिला. पतीने तिच्याशी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध ठेवले. तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. तसेच जातीवाचक शिवीगाळ सुद्धा करत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बालविवाह कायदा व अॅट्रोसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.