गणेश सुळ
पुणे : भारतीय डाक विभागाच्यावतीने एक नोव्हेंबर रोजी मार्केट यार्ड टपाल कार्यालयात पार्सल सुविधा व निर्यात केंद्राचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल राजेंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित इचके (प्रवर अधिक्षक, डाकघर, पुणे) उपस्थित होते.
पुणे शहरातील रहिवासी तसेच विविध भागांत नोकरीनिमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. अशा ठिकाणी असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ तसेच इतर पार्सल पाठवण्यासाठी सध्या टपाल विभागाने ‘दिवाळी फराळ परदेशात’ अशी पार्सल सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेचा लाभ घेत अनेक नागरिक नातेवाईकांना पार्सल सेवेद्वारे फराळ पाठवतील.
या टपाल खिडकी सेवेअंतर्गत मार्केट यार्ड, वानवडी, एन.आय.बी.एम, बिबवेवाडी अशा विविध परिसरात पार्सल पाठवण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे दररोज फराळाची ३० ते ४० पार्सल पाठविण्यात येतील, अशी अपेक्षा डॉ. ईचके यांनी या वेळी व्यक्त केली. या पार्सल पॅकिंग मशिनवर पॅकिंग, प्लॅस्टिंग कोटिंग, रॅपर, बॉक्स अशी सुविधा केली आहे. यासाठी स्वतंत्र काऊंटर व्यवस्था बसविण्यात आली आहे. या सेवेचे दर सुद्धा अत्यंत माफक आहे.
पिकअप व्यवस्था आपल्या कामातून वेळ काढून टपाल कार्यालयात येऊ शकत नसलेल्या लोकांसाठी पुणे टपाल विभागाने पोस्टमनद्वारे मोफत घरून ‘पिकअप’ची व्यवस्था केली आहे. विविध टपाल कार्यालयात पॅकेजिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे घरी तयार केलेला फराळ परदेशात पाठवून अनेकजण नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करत असल्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आनंद अनुभवताना दिसतील. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होता आले नसले, तरी टपाल कार्यालयातून परदेशात फराळ पाठवून भारतीयांनी दिवाळीची आपुलकी जपावी हा मुख्य हेतू साध्य होईल, अशी अपेक्षा डाक विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यालय टपाल विभागाच्या दिवाळीनिमित्त चालू केलेल्या ‘दिवाळी फराळ परदेशात’ या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. कामानिमित्त परदेशात स्थिरावलेले नागरिक कितीही दूर असले तरी भारतात दिवाळी एकत्र येत साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे.
– डॉ. अभिजित ईचके, प्रवर अधिक्षक, डाकघर, पुणे