पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मराठा समाज राज्यभर आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध भागांत आंदोलक आक्रमक झाले आहे. आंदोलनाची धग आता पुण्यात देखील पोहोचली आहे. आदोलकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून, काही वाहनांना आग लावल्याचे देखील वृत्त आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. साखळी उपोषण केले जात आहे. पुढाऱ्यांना गाव बंदी देखील करण्यात आली आहे. सोमवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक केली. काही आमदारांची घरे देखील जाळली.
दरम्यान, पुण्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहे. पिंपरी-चिंचवड येथे काही आंदोलकांनी सोमवारी रात्री टायर पेटवत जुन्या मुंबई पुणे मार्गावर आंदोलन केले होते. तर आज काही आंदोलकांनी सरकारचा निषेध करत मुंडन केले. काही आंदोलकांनी थेट आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत पुण्यातील नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ करत हा मार्ग अडवून धरला. आंदोलकांनी साताऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.