Maratha Reservation : पुणे : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महसूल विभागाकडील दप्तरांमधून मराठा कुणबी नोंदी पडताळणी करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तालुक्यांत तालुकास्तरीय कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. समित्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
खेड आणि जुन्नर तालुक्यांत सर्वाधिक
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून आज अखेरपर्यंत १ लाख ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर या दोन तालुक्यांत सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्याचा समावेश आहे. सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात १२ हजार २५४ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या. आता या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे २४ लाख नोंदी तपासण्यात आल्याचे गुरुवारी (ता. २३) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सन १९६७ पूर्वीच्या नोंदी
सुरू असलेल्या या पडताळणीत सन १९६७ पूर्वीच्या नोंदी पडताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तेरापैकी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि मावळ या सहा तालुक्यांत नोंदी सापडत आहेत. शाळांचे दाखले, जन्म-मृत्यूच्या नोंदींमध्ये कुणबी नोंदींचे मोठे प्रमाण दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.