पुणे : जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मराठा संघटनांनी काळे झेंडे दाखवले. गुरूवारी दुपारच्या वेळेस आळेफाटा येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा आंदोलकांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
आळेफाटा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली गेली.
मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले. त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला. त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच जुन्नर विधानसभा दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी हा दौरा आखला होता. निवडणूकीबाबत आपली भूमिका जाहीर न केलेल्या अतुल बेनके यांना शरद पवारांनी राजकीदृष्ट्या घेरायला सुरूवात केल्याची चर्चा रंगली होती. हे सगळं घडल्यानंतर लगेच अतुल बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते कधीही अजित पवार गटात जातील याची शक्यता आहे.