केडगाव : मराठा आरक्षणासह व इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला होता. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्न सोडवला. या शासन निर्णयाचे केडगावमधील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. केडगाव बाजारपेठ येथे आज (दि.27) रोजी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना पेढे भरवत व फटाके फोडण्यात आले.
अंतरवली सराटीमधून निघालेल्या या मोर्चाला ठिकठिकाणाहून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा वाशी येथे पोहोचताच सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे.
आनंदोत्सवात धनगर बांधव सहभागी
आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मराठा बांधावांसह धनगर बांधावही या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मराठा बांधवांनी पेढे भरवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.