उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीसह अन्य अवैध व्यवसायावर थेट कारवाई करणार असल्याचे संकेत नव्याने पदभार स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत. तसेच ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’, असा सज्जड इशाराच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिला.
उरुळी कांचनसह परिसरातील गुंडगिरी, किरकोळ कारणांवरून भांडणे, मारामारी, गांजा, गुटखा, वाहतूक कोंडी आदींवर त्यांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनुभवाचे कसब लावावे लागणार आहे. त्यासोबतच पोलिस ठाण्याची बिघडलेली घडीही त्यांना बसवावी लागणार आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी, दोन गटातील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी, बाजारात होत असलेली मोबाईल चोरीचेही प्रकार होत आहेत. अनेकदा दोन गटात हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पार्किंग असो वा रस्त्यालगत, मंदिराजवळ, दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी व चारचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने नागरिकांकडून पाटील यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी पोलीस दररोज भेटी देणार
शहरातील सराईत गुन्हेगारांवर (रेकार्डवरील) दररोज पेट्रोलिंग करणाऱ्यांचा ‘वॉच’ असणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रेकार्डवरील गुन्हेगारांच्या घरी भेटी देऊन तो घरात आहे का, बाहेर असल्यास तो कोठे आहे, त्याच्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून तो गुन्हेगार शहरातील नवीन गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे की नाही, याची खात्री होईल. त्यातून गुन्हेगारी आटोक्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलिस खात्यांतर्गत बिघडलेली स्थिती सुधारणे
– पोलिसांसह डीबी पथकाचा हरवलेला वचक पुन्हा निर्माण करणे
– गुन्ह्यांच्या तपासात अधिकाऱ्यांची क्रयशक्ती वाढवणे ?
– पोलिस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्यांत बदल करणे
– गस्त पथकांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे
– रात्रीसह दिवसाच्या गस्तीमध्येही वाढ करणे
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यावर भर देणार
गुन्हेगारीवर वचक ठेवत आणि समाजातील अनेकांशी सुसंवाद साधण्यावर प्रामुख्याने भर असणार आहे. गुन्हेगारांवर जास्तीत जास्त वचक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न राहील. मोका, हद्दपारीसह त्यांच्यावरील कारवाईंना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सामान्यांना न्याय देण्याची भूमिका राहील.
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरुळी कांचन, ता. हवेली.