पिंपरी : बेकायदेशीरपणे घरात घुसून धमकी देत डंपर आणि जेसीबीच्या सहाय्याने घर पाडले. तसेच घरातील साहित्य चोरून नेले. या प्रकरणी गुरुवारी (दि. १३) शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अक्षय आनंद केदारी (वय ३०, रा. पिंपरी गाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर जिजाबा गायकवाड, सोनू जिजाबा गायकवाड (दोघे रा. सोमाटणे फाटा, मावळ) आणि जेसीबी व डंपर चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील धामणे गावात घडली. गावातील फिर्यादींच्या जागेत असलेल्या घराला त्यांनी कुलूप लावले होते. आरोपींनी अनधिकृतपणे कुलूप तोडून जागेत प्रवेश केला. घरातील सामान बाहेर टाकले.
फिर्यादी अक्षय यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला असता ‘ही जागा आमची आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. ‘आम्ही घर पाडणार’ असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत अक्षय यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार देऊन घरी परतले असता आरोपींनी त्यांचे घर जेसीबी व डंपरच्या साह्याने घर पाडल्याचे निदर्शनास आले.