जीवन शेंडकर
यवत : ”सावध राहा, सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. २४ डिसेंबरपर्यंत सावध राहा, पुढे काय करायचे ते आपण पाहू. आपल्यासाठी पुढे यायला कोणी तयार नाही. त्यामुळे आपणच आपल्याला साथ देत लढायचं आहे”, असे सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची आज मराठा आरक्षणासंदर्भात भव्यदिव्य विराट सभा पार पडली. दौंड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ”राजकीय लोकांनी काही कागदपत्र, पुरावे लपवून ठेवले आणि मराठा समाज जागा झाल्यानंतर सरकार जागेवर आलं. १९६७ ते २०२३ पर्यंत न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली आणि लाखोंच्या संख्येने पुरावे सापडले. पुरावे समितीने त्वरित पुढे आणले”.
मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळण्यासाठी आता मराठा समाज पेटून उठला आहे. आता २४ डिसेंबरला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवणारच आहे. ज्यांना पोटशूळ झाला आहे, त्यांनी आरक्षण घेऊ नये, असे सांगत विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे. तुम्हाला आरक्षण नको असेल तर नका घेऊ, पण मराठा समाजातील इतरांना नुकसान होईल, असे करू नये. या शब्दांत खडेबोल सुनावले.
सावध राहा, सरकार आंदोलनामध्ये फूट पाडेल
सावध राहा, सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. २४ डिसेंबरपर्यंत सावध राहा, पुढे काय करायचे ते आपण पाहू. आपल्यासाठी पुढे यायला कोणी तयार नाही. त्यामुळे आपणच आपल्याला साथ देत लढायचं आहे. आतापर्यंत ७० टक्के लढाई आपण जिंकली आहे. राजकारण्यांनी साथ दिली असती तर ४० वर्षांपूर्वीच आरक्षण मिळाले असते. आपला त्यांनी फक्त वापर केला, आपली चुकी ही आहे की आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे ऐकत राहिलो.
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे लागेल
सरकारला २४ डिसेंबरला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) जाहीर करावे लागेल. जर तसे नाही झाले तर खूप जड जाईल, हे सरकारने लक्षात ठेवावे. सभेच्या शेवटी सकल मराठा समाज स्वयंसेवकांनी आरक्षण मिळेपर्यंत एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमप्रसंगी मराठा समाजाकडून शिस्त पाळली गेली. त्याबद्दल यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी कौतुक केले. याप्रसंगी दौंड तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.