उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी नवरदेवासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेवासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरदेव अभिजीत राजू मिरगणे, राहुल रमेश सरोदे, दत्ता यांच्यासह पाच ते सहा नातेवाईकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करण दीपक सणस (वय २७, रा. उरूळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील उरूळी कांचन परिसरात दीपक सणस यांचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. विवाह समारंभानंतर वर अभिजीत मिरगणे आणि नातेवाईक रात्री साडेआठच्या सुमारास स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकवण्यास सांगितले.
या कारणावरुन अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडील कट्यारीने वार केला. कट्यारीला धार नसल्याने गंभीर दुखापत झाली नाही.
दरम्यान, अभिजीत आणि मित्रांनी मंगल कार्यालयात गोंधळ घालून शिवीगाळ केली. याप्रकरणी सणस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार रमेश गायकवाड पुढील तपास करत आहेत.