शिक्रापूर: डिग्रजवाडी येथील आय टी डब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमसमोरील एका कंपनीच्या मालकीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू होऊन तिघे जखमी झाले. तर नऊ दुचाकींसह दोन सायकल, एक कार व एका बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मुसद्दीलाल प्रॉपर्टीज कंपनीच्या व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पुरुषोत्तम चोगीलाल लाड यांना अटक केली आहे.
डिग्रजवाडी (ता. शिरुर) येथील आय टी डब्ल्यू प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये १९ जून रोजी सकाळच्या सुमारास कामगार कामावर आलेले असताना कंपनीमसमोरील मुसद्दीलाल प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भिंत कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू होऊन तिघे जखमी झाले होते. याबाबत बंडू किसन विधाटे (वय ३६, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुसद्दीलाल प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिकार प्राप्त व्यवस्थापक पुरुषोत्तम चोगीलाल लाड (वय ६२ रा. वाघोली ता. हवेली, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतिक जगताप हे करत आहे.