पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली. त्याला राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सचिन खंडू पानसरे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०१० साली पिकअप चालक असलेल्या सचिन पानसरे याने मुलीच्या घरी जाऊन तिच्या असहायतेचा फायदा घेत व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.
नारायणगाव पोलिस ठाण्यात याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली होती. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी निकाल देत आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.