नारायणगाव, (पुणे) : अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून तरुणीच्या मदतीने एकाचा चारचाकी गाडी अंगावर घालत चिरडून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना पुणे – नाशिक महामार्गावरील अयोध्या हॉटेलच्या समोर शुक्रवारी (ता. 12) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नारायणगाव पोलिसांना मिळाले असून पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे.
साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-45, राहणार पणसुंबा पेठ, जुन्नर) असे चिरडून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजित सोनवणे (वय-28, राहणार डीगोरे, ता. जुन्नर) व जेबा इरफान फकीर (वय- 32, पणसुंबा पेठ, जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साबीर शफी ब्यापारी व आरोपी जेबा फकीर हे दोघेही विवाहित असून जुन्नर येथे शेजारी राहण्यास आहेत. साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. जेबा ही एका कंपनीत कामास होती. नोकरी निमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये-जा करत होती. तर अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा व अभिजित यांची ओळख झाली होती. या माध्यमातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले होते.
ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. यावरून साबीर व अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. या वेळी तू येथे का आलास? असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी जेबा ही कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती.
दरम्यान, साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. या बाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित याला दिली होती. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साबीर हा येथील पुणे-नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर मोटार घालून त्याला चिरडले. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.