पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडत असल्यामुळे पुणं चर्चेत आलं आहे. अशातच बिबवेवाडीमध्ये प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाने अंगावर उलटी केल्याने प्रियकराने मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना (दि. 01 सप्टेंबर) रोजी घडली आहे. या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे तर वेदांश काळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई पल्लवी गेल्या काही महिन्यांपासून बिबवेवाडी परिसरात राहत होती. तिचे नाशिकच्या महेश कुंभारशी प्रेमसंबंध होते. (दि. 01 सप्टेंबर) रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने अचानक उलटी केल्याने महेश चिडला आणि त्याने त्या मुलाला हाताने आणि झाडूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये चार वर्षाच्या वेदांशचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले आहे, त्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला आहे. तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, वेदांश बेशुद्ध पडल्यानंतर नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्याला त्यानंतर दोघांनी मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान वेदांशचा मृत्यू झाला आहे. मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर येईल या भीतीने पल्लवी आणि महेशने तो खाटेवरुन खाली पडल्याचा बनाव रचला होता. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमुळे त्यांचा हा बनाव फसला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.