उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत विद्युत पथ दिव्याच्या लोखंडी पोलला हात लागल्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसून 35 वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्र- ३ मधील नवी तांबे वस्ती परिसरात मंगळवारी (ता. 04) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय नाना ननावरे (वय – 35 रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ननावरे यांच्यावर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय ननावरे हे तांबे वस्ती परिसरात राहतात. तसेच त्यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीने पथ दिव्याचा लोखंडी पोल उभारला आहे. मंगळवारी ननावरे हे जेवण करून हात धुण्यासाठी बाहेर आले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलला त्यांचा हात लागला. त्यानंतर ननावरे हे जोरात ओरडले व जमिनीवर कोसळले.
दरम्यान, यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी ननावरे यांना विचारले असता, त्यांनी लोखंडी पोल हात लागल्याने करंट बसल्याची माहिती दिली. यावेळी काही नागरिकांनी घरात जाऊन टेस्टरच्या सहाय्याने चेक केले असता, लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याचे दिसून आले. संजय ननावरे यांच्या हाताला व गुडघ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन म्हणाले, “विद्युत पोल असलेल्या ठिकाणी झाडे आहेत. या झाडाची फांदीने तार घासून हा करंट लोखंडी पोलमध्ये उतरला. त्याची दुरुस्ती आज (दि. ५) करण्यात आली आहे.”
याबाबत बोलताना भाजपाचे उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन म्हणाले, “उरुळी कांचन ग्रामपंचायत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे. पावसाळ्यापूर्वी विजेची उपकरणे कशी आहेत, हे महावितरणने बघून ती व्यवस्थित करून घेणे, ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. एखादी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वच्या सर्व उपकरणे दुरुस्त करावीत.”