हडपसर, (पुणे) : जन्मदात्या बापानेच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी तिच्या खोलीत झोपलेली असताना आरोपीने तिच्या सोबत अश्लील चाळे करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. मुलगी दचकून जागी झाली असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला. वडील असल्यामुळे पिडीत मुलीने याबाबत कोठेही वाच्यता केली नाही.
26 मे रोजी चतुर्थी असल्याने पिडीत मुलीचे आजी-आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर येथे गेले होते. तर पिडीत मुलगी तिच्या आईच्या वडिलांकडे गेली होती. रात्री घरी आल्यावर पिडीत मुलगी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरुममध्ये नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तिने त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला. या प्रकारानंतर ती नराधम बापाला धक्का देऊन पळून गेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.