शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर रस्त्याने विरुद्ध दिशेने निघालेल्या एका पिकअपच्या धडकेत एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. याबाबत कलीम अब्दुल कलाम अन्सारी (वय २७ रा. गणेश नगर वडगाव शेरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पिकअप वरील चालक विशाल गुलाब यादव (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. फतेपूर नसुद्दिनपूर जि. आजमगड उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-अहिल्यानगर रस्त्याने खुर्शीद अन्सारी हे दुचाकीहून सणसवाडी बाजूने पुणेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुणे बाजूने विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअपची खुर्शीद यांच्या दुचाकीला समोरून धडक बसून अपघात झाला. दरम्यान नागरिकांनी खुर्शीद अन्सारी यांना उचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अन्सारी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहेत.