पुणे (Pune News) : भाऊबीजेनिमित्त बहिणीच्या घरी भाऊ दुचाकीवरून निघाला होता. धायरीवरून कात्रजकडे जात असताना नवले पुलाजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (ता. १५) दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आंबेगाव पठार येथे ही घटना घडली. पंकज मनोहर पायगुडे (वय २९, रा. धायरी फाटा) असे डंपरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तन्मय मनोहर पायगुडे (वय २६, रा. धायरी फाटा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक हिमांशू मोहनलाल चोप्रा (वय ३६, वडगावशेरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज पायगुडे हा भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटायला दुचाकीवरून निघाला होता. धायरीवरून कात्रजकडे जात असताना नवले पुलाजवळील महालक्ष्मी ग्रेनाईड दुकानासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने पंकजच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या दुर्दैवी अपघातामध्ये पंकजचा मृत्यू झाला. नवले पुलाजवळच्या वळणावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.