पिंपरी: पावसापासून बचाव करण्यासाठी एक मजूर अंगावर बॅनर घेऊन झोपला होता. मात्र, अज्ञात वाहन चालकाला तो मजूर बॅनरखाली दिसला नाही. त्यावेळी मजुराच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथे घडली.
कपिल विलास अंकुरे (वय २१, रा. बोरी, परभणी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण मजुराचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी बस स्टॉप जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा खून झाला असल्याची माहिती अशोक नावाच्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षास कळवली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांना तेथे एका बॅनरखाली कपिल याचा मृतदेह आढळून आला. कपिलच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंगावर मारहाण केल्याच्या कोणत्याही खूना नव्हत्या. तसेच शवविच्छेदन अहवालात देखील कपिलचा मृत्यू डोक्यावरून चाक गेल्याने झाला असल्याचे म्हटले आहे.
सध्या पावसाळा सुरु असून बचाव करण्यासाठी अनेकजण अंगावर बॅनर घेतात. अशाच प्रकारे कपिल अंकुरे याने अंगावर बॅनर घेतला होता. मात्र, अज्ञात वाहन चालकाला बॅनरखाली झोपलेला कपिल दिसला नाही अन् त्या वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.