उरुळी कांचन, (पुणे) : अपघातग्रस्त वाहन घेऊन जाणाऱ्या क्रेनला दुचाकीस्वाराने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (ता. 27) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
प्रदीप सिध्दाप्पा जेवरे (रा. आळंद, रेवण सिद्धेश्वर कॉलनी, ता. आळंद जि. गुलबर्गा राज्य – कर्नाटक, सध्या रा. काळेवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मंजुनाथ विश्वनाथ निपाणी (वय -39, रा. चौधरी वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वतः मृत्यूस कारणीभूत झाल्याने प्रदीप जेवरे याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवाडी चौकात बस व एका टँकरचा अपघात झाला होता. यातील अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने मंजुनाथ निपाणी हे घेऊन निघाले होते. यावेळी चौकाच्या पुढे वाहतूक कोंडी झाली असल्याने क्रेनचा वेग कमी होता. यावेळी पाठीमागून वेगात आलेला प्रदीप जेवरेने क्रेनला धडक दिली.
दरम्यान, या अपघातात प्रदीप याच्या डोक्याला तसेच अंगाला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होले करीत आहेत.