उरुळी कांचन, (पुणे) : नर्सरीत काम करताना सापाने चावा घेतल्याने एका ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सहजपूर (ता. दौंड) हद्दीतील माकर वस्ती परिसरातील दुर्गा नर्सरी येथे आज सोमवारी (ता. १०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोपट रघुनाथ रामफळे (६५. रा, सहजरपूर फाटा, दुर्गा नर्सरी, विसापूर सुरेगाव, ता. श्रीगोंदा, ता. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोपट रामफळे व काही कामगार हे दुर्गा नर्सरीत काम करीत होते. त्यावेळी पोपट रामफळे यांना एका लहान सापाने चावा घेतला. मात्र, एखादा किटक चावला असेल, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुन्हा आपले काम सुरु केले. काम करीत असताना पुन्हा सापाने हाताला चावा घेतला. यावेळी त्यांना छोटा साप दिसून आला.
यावेळी त्यांची खात्री झाली की, आपल्याला सापाने चावा घेतला. त्यानंतर पोपट रामफळे हे घाबरले. त्यांनी इतर कामगारांना साप चावल्याचे सांगितले व चक्कर येऊन खाली कोसळले. कामगारांनी रामफळे यांना उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधत रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरम्यान, उपचारासाठी आवश्यक ती सर्व औषधे वापरण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पोपट रामफळे यांचा मृत्यू झाला.