पिंपरी : बांधकाम साईटवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी (दि.१७) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पृथ्वीराज सुभाषराव शिंदे (वय २३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष भाऊसाहेब शिंदे (वय ४५, रा. लातूर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश विशंभर चित्ते (वय ४३, रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ऑगस्ट रोजी पुनावळे येथील अनिका पिकाडली फेज २ येथे घडली. फिर्यादी यांचा मुलगा पृथ्वीराज शिंदे हा पुनावळे येथील अनिका पिकाडली फेज दोन या बांधकाम साईटवर इलेक्ट्रिकचे काम करत होता. हे काम करत असताना ठेकेदार सुरेश चित्ते यांनी पृथ्वीराज शिंदे यांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट अथवा इतर कोणतीही सुरक्षा साधने दिली नाहीत. तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पृथ्वीराज शिंदे बांधकाम साईटच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.