पुणे : शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात नियोजित गृहप्रकल्पाच्या पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकामाच्या ठिकाणी क्रेन यंत्रणा उपलब्ध करून देणारी कंपनी, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुरुवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) हे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ऑरेंज मशिन टेक प्रा. लि.चे संचालक आणि ठेकेदार प्रवीण नाथा कोदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकरशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकात (सेव्हन लव्हज् चौक) सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. चंद्रा बुधवारी (दि. २४) पात्रा बांधकामाच्या ठिकाणी लावलेल्या टॉवर क्रेनचे काम करीत होता. त्या वेळी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.