उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी राज्य महामार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नवीन बेबी कालव्याचा लोखंडी कठडा तोडून एक चारचाकी पाण्यात पडली आहे. या घटनेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला आह, तर तिघेजण जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. 23) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी कठडा तोडून गाडी कालव्यात कोसळली.
अमर साहेबराव घाडगे (वय- 28, रा. जुन्नर,) असे अपघातात मृत्यू झालेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात गणेश संजय थोरात (वय- 22), शुभम शंकर इंगोले (वय- 21, रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली), व आदित्य महादेव तावरे (वय- 20, रा. जुन्नर,) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण चारचाकी गाडीतून निघाले होते. शिंदवणे येथील बेबी कालव्यावर आले असता अमरचे गाडीवरील नियंत्रन सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली.
दरम्यान, गाडी कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी व सचिन उर्फ बाळा महाडिक, कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. यांनी तात्काळ मदत केली. यावेळी चौघांना गाडीतून बाहेर काढले. यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. तर चालक अमर घाडगे याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर तब्बल सदर ठिकाणी तब्बल दीड ते दोन तासांनी दोन पोलीस व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. उरुळी कांचन पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.