बारामती, (पुणे) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेसह तिघांनी एकाला तब्बल 2 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 ऑक्टोबर 2023 ते 14 मे 2024 दरम्यान घडली आहे.
विजय वसंत कुंभार, शुभांगी विजय कुंभार, विशाल बाळू भोसले (रा. तिघेजण गुणवडी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव मारुती ननवरे (वय 33, व्यवसाय शेती रा. राजाळे ता. फलटण जि. सातारा) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव ननवरे यांना आरोपी कुंभार व भोसले यांनी इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला अल्पवेळेत चांगले पैसे रिटर्न म्हणुन देऊ, असे आश्वासन देत गुंतवणूक करायला भाग पाडले. त्यानुसार ननवरे यांनी व त्यांच्या आई अशा दोघांनी फोन पे, गुगल पे वरून आणि काही रोख स्वरुपात 2 लाख रुपये दिले.
तसेच महिन्याच्या 5 तारखेला 1 लाख रुपयांसाठी 12 हजार रूपये प्रमाणे तुमच्या खात्यात परत करणार आहोत व उर्वरित रक्कम 11 महिन्यांमध्ये दुप्पट होईल, असे फिर्यादी ननवरे व त्यांच्या आईला विश्वासात घेऊन विजय कुंभार, शुभांगी कुंभार आणि विशाल भोसले यांनी मनपरिवर्तन केले.
दरम्यान, एक महिना झाल्यानंतर त्यांना फोनवर संपर्क साधून पैशाची मागणी केली असता त्यांनी ननवरे कुटुंबियांना पोलीस केस करू नका. पोलीस केस कराल तर आम्ही जेलमध्ये गेल्यावर तुम्हाला रूपया देखील भेटणार नाही, अशी धमकी दिली. वरील तिघांनी हेतुपरस्पर स्वतःच्या फायद्याकरिता अप्रामाणिकपणे पैसे घेत आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात वरील तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक खाडे करीत आहेत.