नारायणगाव : नारायणगाव परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे (वय ३०रा. वळणवाडी मांजरवाडी ता. जुन्नर जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दि.२१ नोव्हेंबरला शिरोली तर्फे आळे गावातील मळगंगा मातेचे मंदिर येथून दानपेटी फोडून त्यातील अंदाजे १ हजाराची रक्कम चोरून नेल्याची फिर्याद दत्तात्रय बबन डावकर (रा. शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन दिल्याने गुन्हा दाखल केला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून नारायणगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिर चोरी तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अशा गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपभोगीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, जगदेव पाटील, पोलीस हवालदार संतोष कोकणे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे आदींच्या पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी संदीप उर्फ भावड्या वाल्मीक पथवे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले १ हजार रुपये रोख रक्कम तसेच ८६ हजार रुपये किमतीच्या ४ मोटरसायकल हस्तगत केल्या. नारायणगाव पोलीस स्टेशन, आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हे उघडकिस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.