पुणे : धनकवडी येथे पत्नीचा खून करून तिने गळफास घेतल्याचा बनाव करणाऱ्या पतीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. ६ जून रोजी अंजना ऊर्फ अंजली बापू खंडाळे ऊर्फ अंजली स्वप्नील मोरे (वय २९, रा. तीन हत्ती चौक, धनकवडी) या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. याबाबत तिच्या नातेवाइकांनी भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले होते. या नातेवाइकांनी अंजलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर दिली होती.
महिलेच्या मृत्यूबाबत संशय आल्याने पोलिसांनी या मृत्यूची चौकशी सुरू केली होती. तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक यांना खबऱ्यांमार्फत महिलेच्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर तिला फासावर लटकवून निघून गेला. तसेच आपण काहीच केले नसल्याच्या आर्विभावात वावरत असल्याची माहिती मिळाली.
याबाबत हकीकत अशी की, मयत महिलेचा पती स्वप्नील शिवराम मोरे (वय ३०, रा. घोरपडी पेठ) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. माझी पत्नी अंजली हिच्या चारित्र्याबाबत संशय असल्याने त्याचा राग मनात धरून ६ जुलै रोजी राहत्या घरात नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून ठार मारून तिला छताला लटकवून गळफास घेतल्याचा बनाव केल्याचे स्वप्नील मोरे याने सांगितले. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.