पुणे: सामाजिक सुरक्षा विभागाला खराडीत स्पा सेंटरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय चालत असल्याचा पर्दापाश करण्यात शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी महिलांची सुटका करून एकास अटक केली आहे.
सुरेश दिपक इंगळे (वय-28 रा. प्रगती नगर, काळेपडळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील गेरा इम्प्रेरियम अल्फामध्ये पहिल्या मजल्यावरील द रिलीफ स्पा येथे खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्या ठिकाणी पाठवून दिले. यावेळी सदर ठिकाणी महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर बनावट ग्राहकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत महिलांची सुटका केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड करीत आहेत.