उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील निसर्ग आश्रमजवळ बेकायदा कोयता बाळगल्याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (ता. ०८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
कृष्णा नाना गायकवाड (वय – २३, रा. गुरूदत्त कॉलनी, उरूळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ हजार रुपये किमतीचा 1 फुट 3 इंच लांबी असलेला देशी बनावटीचा लोखंडी धारदार कोयता ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षय मारूती कामठे (वय – २९) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालीत असताना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील निसर्ग आश्रमजवळ निळया रंगाची पॅन्ट व निळया रंगाचा फुल शर्ट घातलेला एक इसम संशयितरीत्या फिरत असताना पोलिसांना दिसून आला. त्यानुसार पोलीस हवालदार अक्षय कामठे यांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याची तपसणी केली असता त्याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीचा धारदार लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता वरीलप्रमाणे सांगितला. तसेच शारीरिक इजा होईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्याची किंवा बाळगण्याची मनाई असताना त्याने हा प्रकार केला. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तपास पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.