दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या हेतूने कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (ता. १३) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी या तरुणाला कोयत्यासह ताब्यात घेतले.
दत्तात्रय वामन भगत (वय २९, रा. वासुंदे, ता. दौंड), असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार इन्कलाब रशीद पठाण वय-42) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वासुंदे गावचे पोलीस पाटील निलेश जांबले यांनी पोलीस हवालदार अमीर जिलाणी शेख, अमोल देवकाते यांना फोन करून सांगितले की, वासुंदे गावात एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत असून दहशत पसरवित आहे. त्यानुसार, त्या ठिकाणी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वासुंदे गावचे हद्दीत एक इसम हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरताना दिसला. तेव्हा त्याला थांबवून त्याची चौकशी केली.
नंतर त्याच्या हातातील कोयता ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करत आहेत.