लोणी काळभोर, (पुणे) : दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-6 च्या पोलिसांनी कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले आहे. मुंबई येथे दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासुन सदरचा आरोपी हा फरार होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. साहिल राजु शेख (वय 24, धंदा व्यवसाय, रा. 38 मॅजेस्टिक पार्क, बी बिÏल्डग, फ्लॅट नं. 1206, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम हा स्वत:कडे बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत आहे.
सदर प्राप्त बातमीची शहनिशा करण्यासाठी गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथकाने वडाचीवाडीमधून आरोपी साहिल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दरम्यान, सदर आरोपी हा व्हीपी रोड पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्हयात दोन वर्षांपासून पाहिजे आरोपी असून सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे.
सदरची कामगीरी गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे व किर्ती मांदळे यांनी केली आहे.