माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल २४ जून रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण ९० उमेदवार रिंगणात असून, ६७ मतदान केंद्रांवर १९,५४९ मतदारांपैकी सुमारे १६,५२३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी होती, मात्र दुपारी काहीशी मंदी जाणवली. संध्याकाळी पुन्हा मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले, आणि अखेरच्या एका तासात चांगलीच गर्दी झाली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, भाजप नेते चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’, तसेच ‘कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती’ या चार पॅनेलांमध्ये चौरंगी लढत रंगली आहे. यामुळे निवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढला आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ही दुसरी वेळ आहे, जिथे दोघे एकाच राजकीय मैदानात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बारामती शाखेच्या रात्री सुरू असलेल्या व्यवहारांबाबत वाद निर्माण झाला होता. विरोधी पॅनेलने त्यावर आरोप केल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.

‘ब’ गटात तब्बल ९९ टक्के मतदान
या निवडणुकीसाठी सात गटांमध्ये मतदान घेण्यात आलं. ‘ब’ वर्गात उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उभे होते आणि अध्यक्षपदासाठी आपलं नाव जाहीर केलं होतं. या गटात १०२ पैकी १०१ मतदारांनी मतदान करून ९९ टक्क्यांचं उच्च टक्केवारी गाठली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,
“गेली ३४ वर्षे मी काम करतो आहे. लोकशाहीमध्ये मतदारांचा सर्वोच्च अधिकार आहे. कारखान्याचा विकास कोण करणार हे मतदार ठरवतील. बँकेची शाखा रात्री उघडी होती, पण आमच्या पॅनेलचा कोणीच तिथे उपस्थित नव्हता.”
चंद्रराव तावरे म्हणाले,
“या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचं दिसत आहे. मात्र, आम्ही गेली ४० वर्षे काम करतो आहोत. लोकांचा कल आमच्याकडे आहे. प्रेम आणि विश्वास हे पैशांपेक्षा मोठे असतात.”







